कोल्हापूर दुघ संघ गोकुळ निवडणूक: राजर्षी शाहू आघाडीला पॅनल तो पॅनल मत द्या हसन मुश्रीफ यांचं आवाहन
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. गोकुळच्या निवडणुकीदरम्यान कोल्हापुरातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पारंपरिक वैरी माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक गट आणि पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील गट आमने सामने आलेले आहेत. टीकांचा वर्षाव दोन्ही बाजुंनी होत आहे. दोन्ही बाजूंनी प्रचारसभा घेण्याचा धडाका लावला आहे.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने राज्याच्या राजकारणात गोंधळ उडाला आहे. त्यांनी म्हटले आहे की,”मी गोकुळच्या सर्व सभासदांना फोन करून पॅनल विजयी करण्याचे आवाहन केले आहे. गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांना मतदानाची संधी मिळत आहे.
विरोधी पॅनेलचे लोक तुम्हाला लक्ष्मी देण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही ती लक्ष्मी घ्या. कारण ती आपलीच आहे.परंतु परिवर्तन करा” असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कागलमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीच्या बाजूने ते बोलत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले की, गोकुलमध्ये दूध उत्पादकांना दर लिटरमागे २ रुपये दूध दरवाढ देऊ. त्यानंतर सगळ्या बहिणींना भाऊबीज आणि रक्षाबंधनाला अशी ओवाळी देऊ कि बहिणी पण म्हणतील भाऊराया असावेत तर हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील त्यांच्यासारखेच असावेत, असे वाटले पाहिजे असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आघाडी केली आहे.