कराड: कोरोना महामारीच्या दहशतीच्या वातावरणात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. एक जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे पॅनल प्रमुखांची आणि नेत्यांची डोकेदुखी ठरत आहे. त्यातच काही सामाजिक संघटना कारखान्याची निवडणूक रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करत आहेत तर काही जण जिल्ह्याधिकाऱ्यांकडे अर्ज करत मागणी करत आहे त्यामुळे संभ्रभ वाढला आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही २९ जून २०२१ रोजी होत आहे. २४ मी २०२१ रोजी निवडणुकीचा अधिकृत कार्य्रक्रम जाहीर करण्यात आला होता. आतापर्यंत ६ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत आणि तब्ब्ल १२७ अर्जांची देखील पहिल्याच दिवशी विक्री झालेली आहे. १ जून पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे तर १७ जूनला अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख आहे. कारखान्याची निवडणूक दुरंगी होणार की दरवेळेस सारखी तिरंगी लढत यावेळेस देखील बघायला मिळणार याबाबत संभ्रभ आहे.
सातारा जिल्ह्यातील कराडसह सांगली जिल्ह्यातील कडेगाव,पलूस,शिराळा अश्या पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीस आता खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्या गटाकडून विद्यमान संचालक धोंडीराम जाधव यांनी वडगाव हवेली-दुशेरे गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच गटातून कुसूर येथील विश्वास आत्माराम शिंदे, विंग येथील तानाजी पांडुरंग खबाले, कोडोली येथील गजानन सुभाष जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
सत्ताधारी भोसले गटाने पहिल्याच दिवशी अर्ज भरण्याचा धडाका लावल्याने वडगाव हवेली-दुशेरे भागातील चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अन्य दोन उमेदवारी अर्ज रेठरे हरणाक्ष-बोरगाव आणि रेठरे बुद्रुक-शेणोली या गटातून दाखल करण्यात आलेले आहेत. वाळवा तालुक्यात असणाऱ्या बहे गावचे संतोष भगवान दमाने यांनी तर रेठरे बुद्रुक येथील महेश भास्कर कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पहिल्या दिवशी तब्ब्ल १२७ जणांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांनी दिली आहे.
सध्या कृष्णा कारखान्यात डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनलची एकहाती सत्ता आहे. त्यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची तोबा गर्दी आहे. त्यामुळे नव्या-जुन्यांचा मेळ कसा घालायचा आणि त्यांच्यात योग्य तो समेट घडवून पॅनल कसा विजयी करायचा यासाठी पॅनलप्रमुखांना कसरत करावी लागणार आहे. इच्छुकांनी देखील भोसले यांच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे मोहिते गटाचे अजूनही मनोमिलन झालेले नाही आणि तेथेही दोघांकडे देखील इच्छुक उमेदवार आहेत. त्यातच २१ च उमेदवार फायनल करायचे असल्याने आता कस जुळवून आणणार याबाबत डोकेदुखी वाढली आहे.