मुंबई – महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा बसला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र जीवाची बाजी लावून मदत करत आहे. राज्यातील कोरोना लढ्यात खंड पडू नये यासाठी अनेक दानशूर व्यक्ती मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करत आहे. भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 7 लाखांची मदत देऊ केली आहे.
कोविड 19 साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. कोविड 19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड 19 मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे .
दरम्यान देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात देखील आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत भारतरत्न लता मंगेशकर यांनी महाराष्ट्रासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.