मुंबई: आरोग्य यंत्रणा आणि ऑक्सिजन बेडसचा तुटवडा असतानाही महाराष्ट्राने कोरोनाची दुसरी लाट थोपवली. आता कोरोना रुग्णांचा आलेख खाली आला आहे. त्यामुळे पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. परंतु, कोरोनाची दुसरी लाट पूर्णणे ओसरलेली नाही. तिसरी लाट कधी येईल सांगता येत नाही. पण अशीच गर्दी होत राहिली तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
ते सोमवारी मालाडमधील कोविड रुग्णालयाच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला. कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून सध्या जरी बेडस रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. पुढच्यास ठेच , मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण जगभर कोरोनाची लाट परत उसळत आहे ते पाहून सावध राहावे लागेल, असे उद्धव यांनी म्हटले.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या कार्यक्रमावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महानगर आयुक्त एस के श्रीनिवासन उपस्थित होते.
‘दररोज १५ लाख लसीकरणाची तयारी’
पहिल्या लाटेच्या वेळेस आपण बीकेसी येथे देशातले पहिले फिल्ड रुग्णालय विक्रमी वेळेत उभारले. आपण आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आपल्याकडे दररोज १५ लाख नागरिकांच्या लसीकरणाची क्षमता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.