औरंगाबाद – औरंगाबादमध्ये शहराच्या नावावरून वाद पुन्हा पेटला आहे. लव्ह औरंगाबाद या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. औरंगाबद शहराच्या नावावरुन गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि एमआयएमच्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले होते.
स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंग मध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराचं पूर्वीचं नाव असलेलं खडकी, औरंगाबादचे फलक लावण्यात आले. त्यात आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठाने शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ “सुपर संभाजीनगर” असा डिस्प्ले तयार केला होता.
दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर टीका करत निवडणुकीच्या तोंडावर राजकारण होत असल्याचा आरोप केला होता. इम्तियाज जलील यांनी ट्विटर पोस्ट टाकत शिवसेना चिप राजकारण करत असल्याचा आरोप केलेला. दर पाच वर्षांनी शिवसेना आणि भाजप हा विषय पुढे आणतात. पाणी, स्वच्छता, रस्ते आणि रोजगार या विषयाबद्दल भाजप आणि शिवसेना काही बोलत नाहीत, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली होती.