मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या नातेवाइकांना एसटी महामंडळात नोकरी आणि 10 लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मागील सरकारने मराठा मोर्चातील मृतांच्या नातेवाइकांना 10 लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबत निर्णय घेतला होता या विषयावर पुन्हा चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनात 42 जणांनी बलिदान दिले होते. या सर्वांच्या नातेवाईकांना 10 रुपये देण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. या निर्णयासोबतच आता मृताच्या नातेवाइकाला एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
याशिवाय, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे 2019-20 या शैक्षणिक वर्षात खुल्या प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांना शासकीय ऐवजी खासगी विनाअनुदानित कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला होता. अशा 112 विद्यार्थ्यांना दरवर्षी 7 कोटी 49 लाख 38 हजार रुपये शुल्क परतावा दिला जाणार आहे.