मनसे आमदार राजू पाटील आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामधील सोशल मीडिया वॉर आता थेट रस्त्यावर यायला लागले आहे. मनसे आमदारांच्या प्रश्नाला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी तुम्ही एकदा रस्त्यावर फेर फेटका मारा असे म्हणत राजू पाटील यांना प्रतिउउतर दिले होते. तर आता राजू पाटील यांनी थेट खासदारांच्याच घरासमोरील खड्डा दाखवत राजकारण न करता काम करा असा शिंदे यांना प्रतिटोला लगावला आहे.
“मला फेरफटका मारण्याची गरज नाही. मी या मतदारसंघातच राहतो. मला या मतदारसंघाची पूर्ण माहिती आहे. मतदारसंघ हेच माझं घर आहे. आता राजकारण न करता खड्डे भरण्याचं काम करा”, असा सल्ला राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांना दिला.
नेमकं काय आहे प्रकरण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्याप्रमाणेच डोंबिवलीतही सहज फेरफटका मारावा, किमान त्यामुळे तरी कल्याण-शीळ मार्गावरचे खड्डे भरले जातील, असं उपरोधिक आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं होतं.
राजू पाटील यांच्या या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. “ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवर फॉलोअप घेणाऱ्या आमदारांनी प्रत्यक्षात कल्याण शीळ रोडवर फेरफटका मारावा, जेणेकरुन कल्याण शीळ रोडवर कुठे काम सुरु आहे हे कळेल”, असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना दिलं.
त्यानंतर राजू पाटील यांनी थेट खासदारांच्याच घरासमोरील खड्ड्याचा फोटो दाखवत खड्डे बुजवण्याचे आवाहन केले आहे.