मावळ, खेड, शिरुर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रास जोडणारा प्रमुख महामार्ग म्हणून तळेगाव चाकण शिक्रापूर या महामार्गाची ओळख आहे. या सुमारे ५४ किलोमीटर लांबीच्या महामार्गावरून औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते.सध्या या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढते आहे.याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केंद्रीय परिवह मंत्री नितीन गडकरी यांना एक निवेदन दिले आहे.
यामध्ये या रस्त्याचा सर्वेक्षण अहवाल तयार करून त्याचा ‘भारतमाला प्रकल्पात’ समावेश करावा तसेच या कामास लवकरात लवकर सुरुवात व्हावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यावेळी नितीन गडकरी यांनी या कामाबाबत तत्परता दाखवत तात्काळ मुख्य महाव्यवस्थापक तांत्रिक प्रादेशिक अधिकारी राजेश सिंग यांना फोन करुन तळेगाव-चाकण-शिक्रापुर महामार्गाची पाहणी करून सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी नितीन गडकरी यांच्याशी अर्धा तास या विषयावर चर्चा झाल्याचे देखील आमदार सुनील शेळके यांनी सोशल मीडियादवारे सांगितले आहे.