सिंधुदुर्ग: महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि ठाकरे घराण्याचा संघर्ष सगळ्यांनाच अवगत आहे. आता नारायण राणे हे विरोधी पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्ष मध्ये आहेत. नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींवर शिवसेना आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. सिंधुदुर्ग मध्ये नुकतीच जिल्हा बँकेची निवडणूक झाली. नारायण राणे आणि आपल्या राजकीय शक्तीचा वापर करत जिल्हा बँक त्यांच्या ताब्यात ठेवली. यानंतर त्यांनी कुडाळचे पंचायत समिती सभापती यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश करत शिवसेनेला धक्का दिला होता.
आता कुडाळचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी देखील नारायण राणे यांना जोरदार धक्का दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली गावात भाजपचे सरपंच काका राणे , अमोल राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जानवली गावचे सरपंच काका राणे, अमोल राणे यांच्यासह रजत राणे, राजेश परब, पांडुरंग मेस्त्री या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी शिवबंधन बांधून या सर्वांचे पक्षात स्वागत केले.
सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपमध्ये अनेकदा वादंग पेटले आहे. सेना – भाजपमधील नेते – कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये उड्या मारताना पाहायला मिळत आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघात शिवसेनेला धक्का देत राणेंनी कुडाळच्या सभापतींना भाजपात आणलं होतं. तर दुसरीकडे अवघ्या तीन दिवसांत वैभव नाईक यांनी वचपा काढला होता . कट्टर राणे समर्थक पंचायत समिती सदस्याला शिवसेनेत प्रवेश देत नाईकांनी राणेंवर पलटवार केला होता. कट्टर राणे समर्थक असलेल्या कुडाळ पंचायत समिती सदस्य नीलिमा वालावलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.