पुणे : मागील काही महिन्यात अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण चांगलेच गाजले. मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे हे प्रकरण सोपविण्यात आले होते. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप देखील केले. आता हे प्रकरण शांत होत असतानाच, मनसेच्या नेत्याने या प्रकरणात आता आजी-माजी मुख्यमंत्र्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली आहे.
मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मुख्यमंत्री तसेच भाजप खासदार नारायण राणे यांचे फोटो शेअर करत लिहिले की, जेव्हा महाराष्ट्र राज्याचे एक माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार आत्ताच्या मुख्यमंत्री साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन बोलतात आणि महाराष्ट्राच्या एका तरुण मंत्री साहेबांवर खुनाचे आरोप करतात, तेव्हा राजकारणात सक्रिय असणाऱ्या माझ्या सारख्या एका सामान्य लोकप्रतिनिधी ला प्रश्न पडतो की कोण खरे आणि कोण खोटे ?
या असल्या घाणेरड्या राजकारणामुळे मनाला खूप त्रास होतो आणि वाटत आपण चुकीच्या मार्गावर तर नाही ना ? त्यासाठी यांनी राजकारणाला बदनाम करू नये हिम्मत असेल तर दोघांची ही नार्को टेस्ट घेतली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. यामुळे सत्य समोर येईल, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.