मुंबई – भाजप पाठोपाठ आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मंदिर खुली करावीत यासाठी सरकारला विनंती केली आहे. सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा. पण तरीही सरकारने जर ह्या विषयी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, पण ही वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही अशी अपेक्षा आहे अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
काय म्हणालेत राज ठाकरे आपल्या पत्रामध्ये नेमकं
सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे.
ह्या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये ?
‘अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत,
सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे
ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का ?
ह्या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे ?
तसेच कोरोनामुळे जेव्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते तेंव्हा मंदिरं बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्ही देखील समर्थन केलं होतं
पण आज जेंव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना नेमकं महाराष्ट्रातच देवळं का बंद ठेवली जात आहेत ?
जर मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथिल करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते तर तशीच चौकट मंदिर प्रवेशासाठी देखील असू द्या.
लॉकडाऊनच्या काळात आषाढीची वारी असो, गोपाळकाल्याचा उत्सव असो की गणेशोत्सव असो राज्यातील हिंदू बांधवांनी कमालीचं सामंजस्य दाखवलं आहे, सरकारच्या आदेशांचं अत्यंत समजूतदारपणाने पालन केलं आहे त्यामुळे उद्या मंदिर उघडली तर ह्या राज्यातील माझा हिंदू बांधव आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळेल ह्याची मला खात्री आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
#हिंदुजनभावना #मंदिर #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #मनसे #महाराष्ट्रधर्म #TemplesInMaharashtra #Hindufaith #livelihood #EconomicUpheaval #MNSforHinduTemples pic.twitter.com/V7y7gymt1O
— Raj Thackeray (@RajThackeray) September 3, 2020
त्यासोबत मंदिरं सुरु करणं म्हणजे निव्वळ काही भक्तांच्या पुरता हा विषय मर्यादित नाही, इथे त्यात देवाची सेवा करणारे पुजारी असोत, गुरव असोत की त्या मंदिरावर अवलंबून असणारी एक छोटीशी अर्थव्यवस्था असो ह्यांचा सरकार विचार करणार आहे का नाही? अर्थव्यवस्थाच जर कोलमडणार असेल तर त्यांनी साकडं घालायचं कोणाकडे? असंही राज ठाकरेंनी राज्य सरकारला विचारलं आहे.
लोकांनी सरकारकडे विनंत्या, आर्जवं केली, टाहो फोडला, पण सरकार स्वतःच्या धुंदीत तल्लीन झालंय त्यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ ह्या अंतिम श्रद्धेतून त्यांना त्यांच्या ईश्वराला साकडं घालायचं आहे, देवा ह्या अस्मानी, सुलतानी संकटातून सोडव असं आर्जव करायचं आहे आणि म्हणूनच सरकारने देव आणि त्याचे भक्त ह्यांची ताटातूट करण्याचा फंदात पडू नये अशा शब्दात राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारला फटकारलं आहे.