पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेकडून रुपाली पाटील ठोंबरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी दिली होती. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोनकरून रुपाली पाटील यांची विचारपूस केली आहे.
‘तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’, असे राज ठाकरे यांनी फोनवर रुपाली पाटील यांना सांगितले. ज्यांच्या डोक्यावर राजसाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे, त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही. अश्या धमक्यांना मनसे वाले भीक सुद्धा घालत नाही, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली.
पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर मनसेकडून रूपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांनी नगरसेविका म्हणून काम देखील पाहिलेले आहे. तसेच, सध्या त्या मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.