अमरावती : मागील काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या चांगलीच जुंपली आहे. मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या ऑफिसवर देखील कारवाई केली. याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावत बाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊत यांचा तातडीने राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे.
कंगनाच्या बाजूने उभ्या राहत राणा यांनी बीएमसीने केलेली कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी महिलांबद्दल सार्वजनिक ठिकाणी बोलताना निश्चितच भान ठेवायला हवे होते. महिलांबद्दल बोलताना मानमर्यादा ठेवून बोललं पाहिजे. राऊत यांचे समर्थन करायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी उघडपणे त्यांचे समर्थन करावे अन्यथा राऊत यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात कोरोना हा वाढत आहे. तर भंडारा-गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला. तेथे मुख्यमंत्री गेले नाही. त्यामुळे “मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर निघा”, असा टोलाही खासदार नवनीत राणा यांनी लगावला.