कोल्हापूर- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेत्यांनीही आपल्याच पक्षाचे असलेले राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले यांनाही या मुद्द्यावरून लक्ष्य केल्याचं दिसलं.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, निलेश राणे यांच्यानंतर आता खासदार नारायण राणे यांनी संभाजीराजेंवर टीका केली. नारायण राणेंच्या टीकेनंतर संभाजीराजेंनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एकप्रकारचा इशाराच दिला आहे.
संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्यानं ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र, जनता त्यांच्या बाजूने आहे का?,असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला होता. राणेंच्या या टीकेनंतर संभाजीराजे यांनी इशारा देणारं एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये संभाजीराजेंनी कोणाचंही नाव न घेता हा इशारा दिला. छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे.
संभाजीराजेंनी ट्वीटमध्ये इशारा दिला की, छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.
छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू.
ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 4, 2021