मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. कारण, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पोलिसांची भेट घेतली. यानंतर आता पोलिसांकडून धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने महाविकासआघाडी सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
रेणू शर्मा या गुरुवारी सकाळी डीएन नगर पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. याठिकाणी त्यांनी सहाय्यक पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना आपल्यावरील सर्व अत्याचारांची माहिती दिली. त्यामुळे आता पोलिसांकडून धनंजय मुंडे यांची बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांना डीएन नगर पोलीस ठाण्यात बोलावले जाण्याची शक्यता आहे.
रेणू शर्मा नावाच्या एका गायिकेनं धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मुंडे यांनी आपल्याला बॉलिवूडमध्ये संधी देण्याचं आणि लग्नाचं आमिष दाखवून सातत्यानं बलात्कार केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात 10 जानेवारीला तक्रार केली. याप्रकरणी 11 जानेवारीला रोजी मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. तरुणीने केलेल्या आरोपांनुसार 2006 पासून अत्याचार सुरु असल्याचा दावा तिने केला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपली बाजू सविस्तरपणे मांडली आहे.