काल संपूर्ण देश राम मंदिर पायाभरिणीचा उत्सव साजरा करत असताना धुळ्यामधे एक अनुचित प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. ऐन श्रावण महिना सुरु असताना धुळे येथील जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी विशेष सर्वसाधारण सभेपूर्वी मटणावर ताव मारला. त्यानंतर सभा संपल्यावर सदस्यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. हा प्रकार समजल्यानंतर संबंधित सदस्यांविरोधात तीव्र संतापाची लाट निर्माण झाल्याचे पहायला मिळाले आणि सोशल मीडियावर याबाबत तीव्र निषेद व्यक्त व्हायला सुरुवात झाली.
गोंदूर (ता. धुळे) शिवारातील साई लक्ष्मी लॉन्समध्ये दुपारी दोननंतर सभा झाली. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे अध्यक्षस्थानी होते. सीईओ वान्मती सी., उपाध्यक्षा कुसुम निकम, सभापती रामकृष्ण खलाणे, मंगला पाटील, मोगरा पाडवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी व्यासपीठावर होते.
अनेक वर्षांपासून सभेपूर्वी जेवणावळीचा प्रघात आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती हे वैयक्तीक खर्चातून रोटेशन पद्धतीने जेवणाची मेजवानी देतात. त्याच्याशी जिल्हा परिषद प्रशासनाचा काहीही संबंध नसतो. या स्थितीत शाकाहारी सदस्य आणि जिल्हा परिषद प्रशासनाला नाहक बदनामीला सामोरे जावे लागत असल्याचाही सूर अधिकारी वर्गात उमटला.
गोंदूर धुळे येथील जिल्हा परिषदेवर बहुमताने भाजपची सत्ता आहे.यात काही सदस्यांनी मटणावर ताव मारला. काही सदस्यांनी श्रावणामुळे शाकाहार पसंत केला. यानंतर सभा झाली. ती भाजपच्या विरोधक सदस्यांकडून झालेल्या आरोपांमुळे गाजली. एकीकडे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करत देशाला संबोधित करत होते. आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे ते सांगत होते. त्यावेळी जिल्हा परिषद सभास्थळी मटणावर ताव मारण्याचा बेत सुरू होता. सभेपूर्वी मटणावर ताव, नंतर सभा आटोपल्यावर श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन सदस्यांनी केले. हा प्रकार सायंकाळनंतर शहरासह जिल्ह्यात पसरल्यावर `त्या` मांसाहारी सदस्यांविरुद्ध टीकेची झोड उठली. तसेच संताप व्यक्त झाला. शिवसेनेसह भाजपच्या इतर विरोधकांनी सोशल मीडियावर या प्रकाराचा निषेध केला. त्यामुळे भाजपच्या प्रतिमेला येथे काहीसा तडा गेल्याचा सूर उमटला.