नागपूरमधील लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी महापौर संदीप जोशी आणि पालकमंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वात दोन स्वतंत्र बैठका झाल्या. तरीही लॉकडाऊन हा पर्याय नाही, असा समान निर्णय दोन्ही बैठकांमध्ये झाला.
नागपूरमधील लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला मनपा आयुक्तांसह प्रशासन, पोलीस अधिकाऱ्यांना निमंत्रण होतं. मात्र त्याचवेळी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनीही बैठक बोलावली. या बैठकीलाही त्याच अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. विशेष म्हणजे दोन्ही बैठका दोन वेगवेगळ्या ठिकाणी पण समान वेळेला झाल्या.
“नागपूर शहरात लॉकडाऊन नको म्हणजे नको, असं ठरलं आहे. लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनला विरोध केला. प्रशासनाने लॉकडाऊन जबरदस्तीने केल्यास लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरतील” असा इशारा नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी दिला. आयुक्तांनी महापौरांच्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही, हे न कळवणे अशोभनीय असल्याचेही जोशी म्हणाले.
“नागपुरातील परिस्थिती हाताबाहेर गेली नाही, नागपूरमध्ये लाॅकडाऊन हा पर्याय नाही” असं पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले. लाॅकडाऊनमुळे आर्थिक फटका बसणार आहे, त्यामुळे लाॅकडाऊन न करता इतर पर्याय शोधण्याचं काम आम्ही करतोय, असं पालकमंत्री म्हणाले.