नागपूर – नागपूर पदवीधर मतदार संघातून मोठी बातमी समोर येत आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पदवीधर निवडणूकीत पराभव स्वीकारत राजीनामा देणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संदीप जोशी यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता ते सध्या नॅाट रिचेबल असल्याचं सांगण्यात येत आहे.
खरंतर, गेल्या 55 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने झेंडा फडकवला. भाजप उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी यांचा पराभव करत काँग्रेसचे अभिजीत वंजारी मोठ्या फरकाने विजयी झाले. काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांना 61 हजार 701 मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 42 हजार 991 मतांवर समाधान मानावे लागले. वंजारी यांनी संदीप जोशी यांचा 18 हजार 710 च्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला. यामुळे संदीप जोशी यांनी पराभव स्वीकारत राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या राजीनाम्याविषयी भाजप अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना विचारलं असता अद्याप कोणीही अधिकृत भाष्य केलेलं नाही. त्यामुळे याबद्दल आज दिवसभरात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे