सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने आता त्याचा परिणाम राज्यात दिसू लागले आहेत. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर शशिकांत शिंदे जाब विचारण्यासाठी दगडफेक करणाऱ्या युवकांच्या घरी पोहचले होते. यावरून आता आण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.
आमदार शिंदे हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत का हे त्यांनाच माहित, पण ते मराठा आहेत का हे तपासले पाहिजे, अशी जोरदार टीका नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदेंवर केली आहे.
ज्या तरुणांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड केली त्यांच्या मागे एक समाज म्हणून खंबीरपणे असल्याचेही नरेंद्र पाटील म्हणाले. ‘राजकीय पक्षांच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या तरुणांना आमदार शशिकांत शिंदे यांनी धमकी दिली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणांची तक्रार नोंदवून घ्यावी, तसेच त्यांना त्यांचा जीव धोक्यात असल्याने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे,’ अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
ते तरुण कोणत्या पक्षाचे आहेत, याचा शोध लावत बसण्यापेक्षा आरक्षणात कमी पडलो हे सरकारने मान्य करावे, असेही ते म्हणाले.