कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली राज्यातील मंदिरं आणि धार्मिस्थळं सुरू करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी केली आहे.
अनेक नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रश्नांबाबत लोकांचे समाधान करत असतात. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार हेदेखील याला अपवाद नाहीत. लॉकडाऊनमुळे दुर्दशा झालेल्या एका व्यापारी तरुणाने ट्विटरवरून रोहित पवारांकडे एक मागणी केली आणि आमदार पवार यांनीही त्याला तिथेच उत्तर दिले आहे. ‘मंदिर चालू करा दादा, तुळजाभवानी मंदिर 5 महिने झाले बंद आहे. इथल्या व्यापाऱ्यांना खूप त्रास होत आहे. बँक EMI वाढत चालले आहेत,’ अशा शब्दांमध्ये अजिंक्य नावाच्या तरुणाने आपलं दु:ख व्यक्त केले.
यावर उत्तर देताना रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विटरवरून मागणी केली आहे. मंदिरे आणि धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरू व्हावीत असे माझेही म्हणणे आहे. कारण, त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. तसेच, लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळे याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, पर्युषण पर्व काळात मंदिरे खुली करण्याची याचिका जैन समुदायाकडून कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून मंदिरे खुली करता येणार नसल्याचे म्हटले होते. आता असे असतानाच महाविकास आघाडीचे नेतेच जर मंदिरे खुली करण्याची मागणी करत असतील तर यावर मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.