बुलडाणा – २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेचं नाट्य सरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात वाद झाल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखादा मोठा निर्णय घेताना अशाप्रकारच्या गोष्टी (वाद) घडतात. अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
रोहित पवार यांनी अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात काय चर्चा झाली मी ऐकली नाही. मात्र, शरद पवार साहेबांनी सत्तेसाठी पुढाकार घेतला. एखादा मोठा निर्णय घेताना अशाप्रकारच्या गोष्टी (वाद) घडतात. पण ते फार महत्त्वाचे नसते, असे रोहित पवार यांनी सांगितले.
अमित शाह आणि शरद पवार यांच्यात सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी झाल्याचे वृत्त रोहित पवार यांनी फेटाळून लावले. भाजपला त्यांचे 105 आमदार वाचवायचे आहेत. त्यामुळे भाजपकडून काहीतरी पिल्लू सोडले जाते. ही पाच वर्षे संपल्यानंतर पुढील सरकारही महाविकासआघाडीचे असेल, असा दावाही रोहित पवार यांनी केला.