पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला आहे. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला. आवताडे यांनी भालकेंचा 3 हजार 733 मतांनी पराभव केला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून, नेते-कार्यकर्त्यांनी प्रयत्न करुन देखील उमेदवार विजयी होऊ शकला नसल्याचे त्या म्हणाल्या.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीत मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे मनापासून आभार. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करुन देखील येथे आपला उमेदवार विजयी होऊ शकला नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यापुढे आपण सर्वजण निराश न होता पक्षसंघटना व आघाडी मजबूत करण्यासाठी काम करुयात.निवडणूकीत जय-पराजय होतच असतात.यावेळी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले असले तरी विजयाने आपल्याला थोडक्यात हुलकावणी दिली.आपण सर्वांची या निवडणूकीतील मेहनत खुप मोलाची आहे.
सुप्रिया सुळेंनी या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा प्रचार करणारे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार देखील मानले.