देशासह राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टरदेखील कोरोनाबाधित झाल्या आहेत. अशाच एक महिला डॉक्टर ज्या सध्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये (वायसीएम) कोरोना उपचारासाठी दाखल झाल्या आहेत.
डॉ. आरती उदगीरकर यांच्या प्रकृतीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहानुभूतिपूर्वक विचारपूस केल्याने त्यांना मोठा धीर मिळाला असून त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले आहेत. . शरद पवार यांनी डॉ. आरती यांचे वडील नरसिंगराव उदगीरकर यांच्याशी संवाद साधून वायसीएम रुग्णालयात तिच्यावर सुरू असलेल्या उपचाराबद्दल जाणून घेतले.
शरद पवार म्हणाले, ‘वायसीएमच्या डॉक्टरांसोबत माझे बोलणे झाले आहे. डॉ. आरती यांना विश्रांती घ्यावी लागेल. पुरेशा उपचारासाठी दोन ते तीन आठवडे लागतील. काळजी करण्याचे कारण नाही.आरती यांच्यासाठी दवाखान्यात उत्तम औषधे व इंजेक्शनची व्यवस्था आहे. आरतीच्या तब्येतीमध्ये झालेली सुधारणाही डॉक्टर मला कळवीत असल्याचे सांगत शरद पवार यांनी आरती यांच्या वडिलांना धीर दिला
मी गेल्या 16 दिवसांपासून YCM रुगालयात उपचार घेत आहे. शरद पवार यांच्यासारखे एवढे मोठे नेते फोन करून माझ्या प्रकृतीबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करतील, अशी कल्पनाही केली नव्हती. माझी काळजी घेणाऱ्या सगळ्यांची मी ऋणी आहे, अशा भावना डॉ.आरती उदगीरकर यांनी व्यक्त केल्या आहेत. शरद पवारांच्या या संवेदनशीलतेमुळे आपण भारावून गेल्याच्या भावना डॉ. आरती यांच्या वडील नरसिंगराव उदगीरकर यांनी व्यक्त केली आहे.