मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटमध्ये काही मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधाने असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता या चॅटबाबच अजून एक धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. त्यासोबतच अरुण जेटली यांच्या निधनाच्या वृत्तानंतर रिपब्लिक भारत हिंदी टीव्हीत विजयाच्या सेलिब्रेशनसारखं वातावरण होतं, हे या व्हॉट्सअप चॅटमधून सिद्ध होतं आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रोहित पवार यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. “लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपाभक्त पत्रकाराला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या त्या नेत्यांनी सांगावं” असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.
“फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!'” असं देखील रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, 'यही पुछता है भारत!'
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 19, 2021