विरोधकांनी बिळात न बसता एखादे दिवस करोनाचे पीपीई किट घालून करोना वॉर्डात जाऊन यावे, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना लगावला.
मुश्रीफ यांनी करोनाच्या काळातही राजकारण करणाऱ्या विरोधकांवर टीका केली. करोनाच्या काळात महाविकासआघाडीचे सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. तरी देखील विरोधक आंदोलनं करत आहेत. मात्र ही वेळ आंदोलनाची आणि टीका टिप्पणीची नसून सरकारला सहकार्य करण्याची आहे. करोनाची गंभीर परिस्थिती उद्भवली असताना आंदोलन करणाऱ्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे. आंदोलनं करून बिळात लपून बसण्यापेक्षा एखादे वेळी करोना वॉर्डात पीपीई कीट घालून विरोधकांनी जाऊन यावं असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा निष्क्रिय पालकमंत्र्याना बदलून धडाडीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवावं, अशी मागणी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली होती