नाशिक : नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती होऊन तब्बल 22 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. एकीकडे ऑक्सिजनच्या अभावी रुग्ण प्राण सोडत असताना, दुसरीकडे या घटनेमुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आता या घटनेवरून राजकारण सुरू झाले असून, सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधत या दुर्घटनेची जबाबदारी भाजपने स्विकारावी असे म्हटले आहे.
नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन इस्पितळात झालेल्या दुर्घटनेची चौकशी राज्य सरकारने करावी. भाजपा शासित महानगरपालिकेत हा हलगर्जीपणा कोणी केला त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे. pic.twitter.com/6icXenDNr6
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 21, 2021
‘नाशिकच्या झाकिर हुसेन रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी आम्ही करतो. या घटनेला जबाबदार असलेल्यांना अटक करायला हवं. हे रुग्णालय नाशिक महापालिकेचं आहे आणि महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे भाजपने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. महापौर आणि भाजपचे 3 आमदार कुठे आहेत? ते फरार झाले काय?’ असा सवाल सचिन सावंत यांनी ट्विट करत केला आहे.
भाजपशासित महानगरपालिकेत हा हलगर्जीपणा कोणी केला त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करतानाच ऑक्सिजन पुरवठा करण्याचं टेंडर महापालिकेनेच दिले. अशावेळी सरकार कसे जबाबदार असेल? मग आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे का?, असे देखील सचिन सावंत म्हणाले.