उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे” असे वक्तव्य केले होते.
मात्र शरद पवार यांच्या पार्थ पवारांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात, असे म्हणत मल्हार यांनी पार्थ यांना समर्थन दिले.
‘आपण जन्मजात लढवय्ये आहात, हे मी बालपणापासून पाहिले आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत, आणि झुंज कशी द्यायची हे आपल्याला माहित आहे’ असे मल्हार पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.
कोण आहेत मल्हार पाटील –
मल्हार पाटील हे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू, तर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे मल्हार पाटील आणि पार्थ पवार यांचे काका-पुतण्याचे नाते लागते. मात्र वयात फारसे अंतर नसल्याने दोघेही चांगले मित्र आहेत. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबाने गेल्याच वर्षी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला.