पंढरपूर – राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2 मे) निकाल लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 28 वी फेरीमध्ये भाजपाचे समाधान आवताडे 7003 मतांनी आघाडीवर तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे पिछाडीवर आहेत, भाजपचे समाधान आवताडे याना आत्तापर्यंत 83 हजार 779 एवढी मते मिळाली आहेत तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना 76हजार 716 इतकी मते मिळाली आहे. त्यामुळे सध्य स्थितीत भाजपचे पंढपुरात विजयच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण 3 लाख 50 हजार 889 मतदार असून एकूण 524 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. ही निवडणूक राजकीय प्रचारसभा आणि नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे देखील विशेष चर्चेत राहिली होती.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके, तर भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्यात प्रमुख लढत असली तरीही, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.