मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी खंडणी वसुलीचे गंभीर आरोप केले होते. मात्र आता परमबीर सिंग यांच्यावर, मुंबई पोलीस दलाचे अधिकारी अनुप डांगे यांनी केलेल्या तक्रारी नंतर, अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी देखील भष्टाचाराचा आरोप केला आहे.
तसेच त्यांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीचा अर्ज, मुख्यमंत्री यांच्यासह पोलीस महासंचालक यांच्याकडे देखील दाखल केला आहे. अकोला येथील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये परमबीर सिंग यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध २७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, परमबीर सिंग यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांच्या पत्नीचे इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. तिथे हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतंवण्यात आले आहेत, असा आरोप भीमराव घाडगे यांनी केला आहे. याशिवाय परमबीर सिंग यांच्यासह काही पोलिस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप घाडगे यांनी केला आहे.