नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या निर्माणासाठी आज पायाभरणीचा कार्यक्रम सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडला. ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारले जाणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उद्योगपती रतन टाटा आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्याच्या संसद भवनाचे उद्घाटन हे वर्ष 1927 करण्यात आले होते. त्यामुळे या इमारतीला अद्याप 100 वर्ष देखील झालेली नाहीत. अशात मोदी सरकार आधुनिक सोयीसुविधा व सुरक्षेची दृष्टीने महत्त्वाची अशी संसदेची नवीन इमारत बांधत आहे. संसदेच्या नवीन इमारतीला विरोध देखील होताना दिसत आहे. असे असले तरी नव्या संसद भवनाच्या निर्माणासाठी आज पायाभरणीचा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पार पडला. लोकशाहीचे मंदिर ओळखले जाणाऱ्या या जुन्या संसद भवनाविषयी काही रोचक माहिती जाणून घेऊया.
सध्याच्या संसद भवनाची वैशिष्ये –
- सध्याचे संसद भवन हे वर्ष 1927 मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी ही इमारत बांधण्यासाठी केवळ 83 लाख रुपये खर्च झाले. फेब्रुवारी 1921 मध्ये सुरु झालेल्या संसद भवन निर्माणाचे काम 18 जानेवारी 1927 पर्यंत चालले.
- सध्याच्या संसद भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन डय़ुक ऑफ कॅनॉट या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हस्ते करण्यात आले होते.
- सध्याचे संसद भवन हे गोलाकार आहे. तर नवे संसद भवन त्रिकोणी असणार आहे. सदेचे लोकसभा, राज्यसभा, आणि सेन्ट्रल हॉल असे तीन भाग असून, हा परिसर 6 एकरमध्ये विस्तारलेला आहे.
- सुरुवातीला खासदार खासगी वाहनाने संसदेत येत नसे. यासाठी सरकारी बसचा वापर केला जात असे व प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर सर्व खासदार पायी चालत संसदेच्या आत प्रवेश करायचे.
नव्या संसद भवनाची वैशिष्ट्ये –
- संसदेच्या नवीन इमारतचे क्षेत्रफळ 64,500 चौरस मीटर एवढे असेल आणि त्याचा अंदाजित एकूण खर्च 861 कोटी रुपये असेल.
- नवीन संसदेच्या इमारतीत एकावेळी 1224 सदस्य बसू शकतील. तर सध्याच्या श्रम शक्ती भवनाच्या (संसद भवन जवळ) ठिकाणी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची कार्यालये उभारली जातील.
- एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीने या इमारतीचे डिझाईन बनवले आहे,
- नवीन संसद भवनात लोकसभा कक्षात 888 सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था केली जाईल. तर राज्यसभा कक्षात 384 सदस्य बसू शकतील. भविष्यात संसद सदस्यांची संख्या वाढू शकते, हे लक्षात घेऊन बैठक व्यवस्था जास्तीची बनवली जात आहे.
- संसदेची सध्याची इमारत देशाच्या पुरातत्व खात्याकडे सुपूर्द केली जाईल आणि ऐतिहासिक वारसा म्हणून त्याचे जतन करण्यात येईल.
- 75 व्या स्वातंत्र्यदिनी आपण या नव्या संसद भवनातून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु केले जाणार आहे.