जळगाव – माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यांनतर एकनाथ खडसे यांनी भाजप विरोधात अनेक भूमिका घेतल्या. उत्तर महाराष्ट्रात आणखी धक्के देण्याचा इशारा खडसेंसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपला दिला आहे. असे असतानाच भाजपच्या एका मंत्र्यांनी एका पोस्टरमध्ये एकनाथ खडसेंचा फोटो लावला आहे.
भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक मानले जातात. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सावकारेही हातात घड्याळ बांधणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच सावकारेंच्या वाढदिवशी झळकलेलं पोस्टर राजकीय वर्तुळात कुजबूज वाढवण्यास कारणीभूत ठरले आहे. सावकारेंच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कुठल्याही नेत्याचा फोटो न लावता फक्त एकनाथ खडसे यांचा फोटो लावला. या पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
खानदेशातील मोठे नेते म्हणून ओळख असलेल्या एकनाथ खडसे यांनी आपल्या हातावर घड्याळ बांधले. त्यानंतर भविष्यात अनेक उलथापालथी होतील, अशा चर्चा रंगल्या होत्या. अनेक खडसे समर्थकांनी राष्ट्रवादी प्रवेश केला, तर काहींनी पक्षांतराच्या अडचणी येऊ नये म्हणून टर्म झाल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.