मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरातून बाहेरच पडत नाहीत अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात असताना आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामाची पद्धत एकसारखी असल्याचे म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे.
पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला.पंतप्रधान मोदी देखील एका जागेवर बसून काम करतात ते देशभर फिरत नाहीत त्यामुळे मुख्यमंत्र्यांची आणि पंतप्रधानांची कामाची पद्धत सारखी असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री बाहेर गेल्यावर अवाजवी गर्दी होते त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बाहेर जाण्याचा प्रोटोकॉल तोडावा का ? असा सवाल देखील यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री घरातच बसून काम करतात बाहेर पडत नाहीत असे म्हणणाऱ्या विरोधकांचा राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. तसेच कुठे बसून काम करावे हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री सध्या डिजिटली काम करताहेत डिजिटल इंडिया ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. त्यामुळे विरोधकांचा या गोष्टीवर विश्वास नसेल तर त्यांनी आधी पंतप्रधानांना प्रश्न विचारायला हवा कि तुम्ही देश भर का फिरत नाहीत ? असे म्हणत संजय राऊत यांनी जणू विरोधकांना आव्हानच दिले.