कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यातील विविध शहरांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान फडणवीस आणि दरेकर यांनी अधिकाऱ्यांच्यासोबत बैठका घेऊन माहिती घेतली. मात्र, राज्य सरकारच्या नव्या आदेशात अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बंधनं घालण्यात आली आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सडकून टीका केली. “स्वत:चे अपशय झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे”, असा घणाघात दरेकर यांनी केला
“विरोधी पक्षनेत्यांनी कुठे जाऊ नये आणि माहिती घेऊच नये, असा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकारने या शासन निर्णयाच्या माध्यामातून केला आहे. पण कोबंडं झाकलं तरी सुर्य उगवायचा राहत नाही”, असा घणाघात प्रविण दरेकर यांनी केला. “विरोधी पक्षनेत्यांना अनेक व्यासपीठे आहेत. सरकारच्या विविध व्यासपीठांच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात जाऊन लोकांना न्याय देण्याची भूमिका अधिक आक्रमतेने आम्ही यापुढेही करु, असं आश्वासन आम्ही कोट्यवधी जनतेला देतो”, असं प्रविण दरेकर म्हणाले.