प्रत्येक सणाच्या उत्सवात सामान्यांमध्ये त्या उत्सवासोबत आणखी एका गोष्टीचं नेहमी कौतुक राहिलं आहे. ते म्हणजे, हे आपले पारंपरिक सणवार कलाकार मंडळी कशा प्रकारे साजरे करतात. परंपरा आणि संस्कृतीचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाचं महत्त्व अनन्य साधारण आहे. या उत्सवाची आपण सगळेच आतुरतेने वाट पहात असतो.
अक्षय यांच्या घरी गेली चौदा वर्ष नित्य नियमाने बाप्पाचे आगमन होत आहे. मात्र यंदा अतिशय सध्या पद्धतीने आणि मोजक्या स्वरूपात साजरा होणारा गणपती बाप्पाचा महोत्सव कलाकार मंडळींच्या घरी देखील असाच साजरा झाला आहे. प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा आणि निर्माते अक्षय बर्दापूरकर यांच्या मुलुंड येथील राहत्या घरी बाप्पा देखील अशाच छोटेखानी साजात विराजमान झाला आहे. कलेची देवता असलेल्या आपल्या लाडक्या गणराया सोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला मिळतोय याचा आनंद असला तरीही जगावर आलेलं कोरोनाचं संकट लवकर नष्ट होऊ देत हेच मागणं अक्षय बर्दापूरकर यांनी बाप्पाकडे मागितलं आहे.
दरम्यान , लवकरच अक्षय आपले ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच ‘एबी आणि सीडी’च्या भरघोस यशानंतर प्लॅनेट मराठी सहा नव्या कोऱ्या सिनेमा आणि वेबसिरीजची निर्मिती करणार आहे. प्लॅनेट मराठीचा सर्वेसर्वा आणि निर्माता अक्षय बर्दापूरकर याने नुकतीच ही घोषणा केली आहे. शांतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हे आगामी काळातील त्यांचे दोन महत्त्वाचे चित्रपट असणार आहेत.