मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी भिनेता सुबोध भावेंच्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाचे कौतुक केले होते. आता त्यांनी केदार शिंदेच्या नव्या मालिकेचे भरभरून कौतुक केले आहे. सुखी माणसाचा सदरा या मालिकेचा प्रोमो रिलीज झाल्यापासून या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आहे. अभिनेता भरत जाधव या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकणार आहे.
भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर आलेलं पाहून छान वाटलं. ह्या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा 'सुखी माणसाचा सदरा' रोज किमान अर्धा तास तरी मराठी मनांना ह्या अनिश्चिततेतुन ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल…
— Raj Thackeray (@RajThackeray) October 3, 2020
राज ठाकरे यांनी नवीन मालिकेसाठी शुभेच्छा देत लिहिले की, कोरोनाचे सावट आणि त्यामुळे आलेले आर्थिक संकट ह्यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ ह्या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दूरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडेल किंवा सापडू दे असे मनापासून वाटते.
‘भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर आलेलं पाहून छान वाटलं. या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा ‘सुखी माणसाचा सदरा’ रोज किमान अर्धा तासतरी मराठी मनांना या अनिश्चितेतून ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल आणि त्या आनंदात येणाऱ्या दिवसाला सामोरे जाण्याची ताकद मिळेल हे केदार, भरत तुम्ही नक्की पाहा,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी केदार शिंदे आणि भरत जाधव यांच्यासह त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.