पुणे : काँग्रेस पक्षाचे राज्यसभा सदस्य आणि खासदार राजीव सातव यांना १९ एप्रिलला करोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांची २१ एप्रिलला तपासणी केली गेली होती. मात्र २२ एप्रिलला त्यानं करोना झाल्याचे निदान झाल्यानंतर २३ एप्रिलला उपचार घेण्यासाठी त्यांना पुण्यातील जहांगीर रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने, त्यांना तातडीने आयसीयूमध्ये उपचारांसाठी दाखल केले गेले होते. तसेच त्यांना मुंबईत हलविण्याच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या.
मात्र, आज काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी, सातव यांच्या तब्येतीबद्दल महत्त्वाची माहिती दिली असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच ते उपचारांना देखील साथ देत आहे आणि त्यांच्या ऑक्सिजन पातळीमध्ये देखील वाढ होत असल्याने, त्यांना कुठेही हलविण्यात येणार नसल्याचं देखील विश्वजीत कदम यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यांच्यासोबतर यावेळी जहांगीर रूग्णालयातील डॉ. सत्यजीतसिंग गील हे देखील उपस्थित होते.
दरम्यान, त्यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी देखील रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवर चर्चा केली होती. तसेच, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते यांनी देखील सतत फोनच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.