मुंबई : राज्यातल्या करोना परिस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शनिवारी रेमेडीसीवर इंजेक्शन्सचा पुरवठा करणाऱ्या ब्रूक्स फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा जाब विचारण्यासाठी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि काही नेते, हे विलेपार्लेच्या बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात गेले होते. यावरून सध्या राज्यात जोरदार राजकारण सुरु आहे.
एकीकडे सत्ताधारी पुरवठादारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप भाजपने केला आहे, तर भाजप नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यारोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, आज या प्रकरणावरून अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी एक खुलासा केला आहे. त्यांच्या या खुलास्याने ठाकरे सरकार तोंडघशी पडलं आहे.
श्रेयामागे पळणारे, त्यासाठी बिनबुडाचे आरोप करणारे, आघाडीतील नेते आता महाराष्ट्राची माफी मागणार का?@BJP4Maharashtra pic.twitter.com/qMnEzIHgOP
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) April 20, 2021
यावरून ठाकरे सरकारवर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी निशाणा साधला आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित मंत्री होते. ब्रूक्स फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एफडीए खात्याचे सचिव, अधिकारी यांना कल्पना दिली होती. रेमडेसिवीरचा साठा राज्य सरकारलाच मिळणार होता. शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत कंपनीने रेमडेसिवीरचा साठा राज्य सरकारला देणार असल्याचं सांगितलं.
मात्र ही गोष्ट भाजपाच्या माध्यमातून होते आहे, हे कळल्यावर सरकारचा अहंकार जागा झाला. लोकांच्या जीवापेक्षा राज्य सरकारला स्वत:च्या अहंकारातच जास्त रस आहे. रेमडेसिवीर टेंडर काढून कोट्यवधीच्या कमिशनचं नुकसान होईल म्हणून हे कुभांड रचलं गेलं. दुपारी मंत्री धमकी देतात आणि रात्री एका दहशतवाद्याला अटक करावी तसं कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतलं जातं. आता राजेंद्र शिंगणे यांनी सांगितल्यावर या सर्वांचा डाव उघड झाला, असा टोला देखील प्रविण दरेकर यांनी सरकारला लगावला आहे.