निष्क्रीय आणि अपयशी पालकमंत्र्यांच्या कारभारामुळे कोल्हापूर जिल्ह्यात करोना परिस्थिती गंभीर निर्माण झाल्याची जनतेची भावना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घ्यावे. धडाडीचे नेते, कामाचा अनुभव असणार्या हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री पद द्यावे, अशी मागणी धनंजय महाडिक यांनी केली आहे.
महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या वर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सतेज पाटील यांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाडिक यांच्या कोल्हापूर येथील कार्यालयासमोर आंदोलन केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यावरून महाडिक यांनी पालकमंत्री पाटील यांना उद्देशुन म्हटले आहे की खरे पाहता, संपूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्हा कोव्हीडसाठी हॉटस्पॉट बनला आहे
यावर प्रश्न विचारले असता पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून उत्तर दिले जात नाही. सर्वकाही अलबेल असल्याचा भास निर्माण करण्यात ते मश्गुल आहेत. या प्रश्नांवर उत्तरे देण्याऐवजी जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आंदोलनाचा फार्स करण्यात आला, अशी टिका महाडिक यांनी केली आहे.