मुंबई : भारतातील 90 टक्के कोरोना लसींचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी भारतातील श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून धमक्या मिळत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्याला लसीच्या पुरवठ्यावरून धमक्या येत असल्याचे म्हटले आहे. यावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, कोरोना रोखण्यात ‘सिरम’चे सीईओ अदर पुनावाला यांची भूमिका महत्त्वाची असताना काहीजण त्यांना धमक्या देत असल्याची बातमी धक्कादायक आहे. धमकी देणं हे शौर्य नसून अशा लोकांनी धमकी देण्यापेक्षा ‘सिरम’ आणि ‘भारत बायोटेक’ या कंपन्यांना बळ देऊन लस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत!
याशिवाय पूनावाला यांना सुरक्षित वाटेल, असं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारसह आपल्या सर्वांची आहे आणि देशाची जनताही त्यांच्यासोबत आहे.#WeSupportPoonawalla
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 2, 2021
पूनावाला यांना सुरक्षित वाटेल, असं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारसह आपल्या सर्वांची आहे आणि देशाची जनताही त्यांच्यासोबत आहे, असेही रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांचे प्रमुखांचा समावेश आहे. हे सर्व सीरमच्या एस्ट्रा झेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत. यांना धमकी म्हणणंही कमी ठरेल, असा धक्कादायक खुलासा पुनावाला यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.