राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या तडाखेबाज भाषणामुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा पुतण्या आणि आमदार रोहित पवार सुद्धा विरोधकांना जोरदार टोले लगावत असतात. राजकीय मैदान गाजवणारे काका पुतणे आज एकाच दिवशी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करता पाहण्यास मिळाले.
आमदार रोहित पवार हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शहरात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांचं जोरदार स्वागत केलं. राष्ट्रवादी तर्फे शहरात क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रोहित पवार यांनी बॅटिंग करून या स्पर्धेला सुरुवात करून दिली.रोहित पवार यांनी बॅटिंग करताना एकापाठोपाठ दोन खणखणीत षटकार लगावले, रोहितदादांची तुफान बॅटिंग पाहून कार्यकर्तेही चांगलेच हैराण झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. शहरात अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर क्रिकेट सामन्याच्या ठिकाणी भेट दिली. आता अजित पवार खुद्द मैदानात आल्यामुळे कार्यकर्त्यांनी अजितदादांना बॅटिंग करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला
कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे अजितदादांनीही बॅट हातात घेतली. उचलून मारा असं म्हणत कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या नावांनी एकच घोषणाबाजी केली. मग काय, अजितदादांनीही मोठ्या उत्साहाने आलेला बॉल चांगलाच टोलावला.