अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी यंदा गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पुस्तक गणपती ही संकल्पना अंमलात आणली. मात्र असे करताना तरडे यांनी केलेली गोष्ट अनेकांना पटली नाही. तरडे यांनी पुस्तकांचा ढीग रचत ही आरास साकारली. पण, यामध्ये त्यांनी भारतीय संविधानावर पाट ठेवत त्यावर बाप्पांना विराजमान केले. मात्र ही गोष्ट अनेकांना आवडली नाही.
यावरून आता तरडेंवर कारवाई करण्याची मागणी रिपाईचे सचिन खरात यांनी केली आहे. त्यांनी ट्विट केले क, प्रवीण तरडे हे जाणूनबुजून संविधानाचा अपमान करत आहेत. त्यांनी संविधानाच्या पुस्तकावर गणपती बसवून लोकशाहीचा अपमान केला आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरित कारवाई करावी ही विनंती.
प्रवीण तरडे हे जाणूनबुजून संविधानाचा अपमान करत आहेत. त्यांनी संविधानाच्या प्रतीवर गणपती बसऊन लोकशाहीचा अपमान केला आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरित कारवाई करावी ही विनंती. @AnilDeshmukhNCP @satejp @DesaiShambhuraj #सचिनखरात_आरपीआय
— SACHIN KHARAT RPI (@RPIsachinkharat) August 23, 2020
एक व्हिडीओ शेअर करत ते म्हणाले की, संविधान हे सर्वधर्म समभाव मानतं. संविधान कोणत्याही एका धर्माला प्राधान्य देत नाही. प्रवीण तरडे यांनी जाणुनबुजून यांनी भारताच्या संविधानाची प्रत ठेवून गणपती बसवला. या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. फक्त माफी मागून चालणार नाही, महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती करतो की त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा आमच्या पक्षातर्फे प्रवीण तरडे यांना आम्ही महाराष्ट्रात फिरु देणार नाही.
दरम्यान, प्रवीण तरडेंची ही चूक समोर आल्यानंतर त्यांनी याबाबत जाहीरपणे माफी मागितली असून, आपली फेसबुक पोस्ट देखील डिलिट केली आहे.