अहमदनगर – भाजपचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. काँग्रेसमध्ये असतानाही एकमेकांविरोधात उभे ठाकणारे विखे-थोरात पुन्हा आमनेसामने आले आहेत. संगमनेर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींमध्ये विखे विरुद्ध थोरात अशी थेट लढत होणार आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या संगमनेर तालुक्यात 26 गावं आहेत. त्यापैकी 14 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांत विखे-थोरात पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. संगमनेर तालुक्यातील 94 पैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर 90 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.
दरम्यान, कोपरगाव, राहुरी, शेवगाव या तीन तालुक्यात एकही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झालेली नाही. सर्वच्या सर्व ग्रामपंचायतीत निवडणुका होणार आहेत. कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यात चुरस आहे.