मुंबई : ”ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. या वादात मनसेने भूमिका न घेतल्यामुळे शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील ‘रोखठोक’ सदरातून खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
‘मुंबईला पाकिस्तान व महापालिकेस बाबराची सेना असे बोलणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष उभा राहतो हे विचित्र आहे. पण सुशांत आणि कंगनास पाठिंबा देऊन त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय राजपूत, क्षत्रिय मते मिळवण्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान झाला तरी चालेल. हे धोरण ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेणाऱ्यांना शोभणारे नाही. महाराष्ट्राचा अवमान केला म्हणून दिल्लीतील एकही मराठी केंद्रीय मंत्र्यास वाईट वाटले नाही तेथे संतापून राजीनामा वगैरे देण्याची बातच सोडा’ असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
”ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल’ अशी चिंता संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.