अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. नरेंद्र मोदी सकाळी साडेअकराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. आधी त्यांनी हनुमान गढीला जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीला साष्टांग दंडवत घालत नरेंद्र मोदी यांनी आरती केली. त्यानंतर प्रत्यक्ष राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे विधी पार पडले.
अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अयोध्येला जाणार आहे. शिवसेना तेथे थाटामाटात कार्यक्रम घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
संजय राऊत म्हणाले,” राम मंदिर भूमिपूजनाचा हा सोहळा झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. आम्ही अयोध्येत राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिवसेनेच्यावतीने तिथे कार्यक्रम करणार आहे.
संजय राऊत म्हणाले, “राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हा शासकीय कार्यक्रम आहे. आजचा मुहूर्त महत्त्वाचा आहे. साधुसंतांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या मुहूर्तावर भूमिपूजन होत आहे. आजच्या कार्यक्रमाचं श्रेय कोणीही घेऊ नये. कारण हा शासकीय कार्यक्रम आहे. बाळासाहेबांना आणि शिवसेनेला कोणी विसरु शकत नाही. राम मंदिर उभारणीतील त्यांचे योगदान मोठे आहे. अनेकांचे यात योगदान आहे. घुमट काढताना शिवसैनिकांचं मोठं योगदान आहे.”