पुणे – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला गुरुवारी आग लागली होती. काही तासांनी ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. मात्र आगीनंतर अनेकांनी ही आग लावली की लागली?, अशा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर शरद पवार यांनी घातपाताची शक्यता फेटाळून लावली आहे .
घातपाताच्या होणाऱ्या या सगळ्या चर्चा केवळ चर्चाच आहेत. यामध्ये तथ्य नसल्याचं अप्रत्यक्षपणे पवारांनी सांगितलं. सीरम इन्सिट्यूटच्या स्टाफवर माझा संपूर्णपणे विश्वास आहे. आगीची घटना हा अपघातच असावा, असं म्हणत घातपाताचा संशय शरद पवारांनी फेटाळून लावला.
दरम्यान, सीरमच्या आगीबाबत भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी शंका व्यक्त केली. हा घातपाताचा प्रकार तर नाही ना असा प्रश्न मुक्ता टिळक यांनी उपस्थित केला. मुक्ता टिळक यांच्या शंकेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही हीच शंका व्यक्त केली. त्यानंतर अनेकांनी घातपातीची शक्यता दबक्या आवाजात व्यक्त केली.