मुंबई : 1 मे पासून महाराष्ट्रासह देशभरात 18 वर्षांवरींल सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, तर दुसरीकडे लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. यातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सीरम इंस्टिट्यूटने लस देताना महाराष्ट्राला झुकतं माप द्यावे, अशी विनंती केली आहे.
राजेश टोपे म्हणाले की, अदर पूनावाला यांना आमची विनंती आहे की, ते पुण्यातील असल्याने व महाराष्ट्रातच सीरम इन्स्टिट्यूट असल्याने, काहीही करून सीरम इन्स्टिट्यूटने झुकतं माप हे महाराष्ट्राला दिलं पाहिजे.
राज्य सरकारकडे लसीसाठी निधी आहे. सरकार खर्च करायला तयार आहे पण लस नसल्याने कमी गतीने लसीकरण करावे लागते. पुढील काळात राज्यात अधिक वेगाने लसीकरण होणार असून लसी साठी लागणारी कोणतीही किंमत राज्य सरकार द्यायला तयार असल्याचेही टोपे म्हणाले.
लस उपलब्ध नसल्याने, आपल्या जवळ निधी आहे आपण खर्च करायला तयार आहोत, विकत घ्यायला तयार आहोत पण उपलब्ध नसल्याने आज आपल्याला 18 ते 44 वयोगाटातील लसीकरण कमी गतीने करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.