सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात रोज नवे खुलासे येत आहेत. त्याच्या आत्महत्येला आता दोन महिने होत आहेत. या प्रकरणाने आता रजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणात थेट ठाकरे कुटुंबातील सदस्याच्या नावाचा उल्लेख होत असल्याने राज्याच्या राजकारणात या प्रकरणाला महत्त्व आहे. यावर शरद पवार यांनी आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
माझा महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मात्र सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करायची असेल, तर मी विरोध करणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली
“मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांना 50 वर्ष ओळखतो. माझा पूर्ण विश्वास आहे. कुणी काय आरोप केले, याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली, तर निश्चितच दु:ख होतं, पण याची चर्चा ज्या पद्धतीने होते, मला त्याबद्दल आश्चर्य वाटतं” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
“माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही.” अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.