सोलापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची बैठक काल सोलापुरात पार पडली. मात्र प्रचाराच्या बॅनवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
पुणे मतदार संघातून महाविकास आघाडीचे पदवीधरच्या जागेसाठी अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघासाठी जयंत आसगावकर निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ सतेज पटील सोलापूरमध्ये आले होते. मात्र बैठकीत बॅनरवर माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याने समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
बैठकीत नाराज कार्यकर्त्यांनी ‘सुशीलकुमार शिंदे आगे बढो’ असे नारे दिले. या घोषणांमुळे बैठकीत पुरता गोंधळ उडाला. अखेर राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते शांत झाले.
या प्रचार सभेसाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. मात्र बॅनरवर सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांचा फोटो नव्हता.