मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्राची सुनियोजित पद्धतीने बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जात असल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून या प्रकरणावर भाष्य केले असून, सरकारी बंधनाचा भाग म्हणून खोटीनाटी टीका सहन करणे काही यंत्रणांना अपरिहार्य असले तरी सोशल मीडियावर चौखूर उधळणाऱ्यांनी या निर्बंधांचा गैरफायदा घ्यावा असे नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. कंगना राणावत प्रकरण आणि निवृत्त नौदल अधिकाऱ्याने मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केल्यानंतर आता याविषयावर भाष्य करण्यात आले आहे.
सामनाचा आजचा अग्रलेख –
मागील पाच-सहा वर्षांत तर या वाहिन्यांच्या जोडीला ‘सोशल मीडिया’ आला आणि गॉसिपिंगच्या नावाखाली निंदानालस्तीचे घोडे चौखूर उधळू लागले. त्याला ना निर्बंध ना लगाम. विषय कोणताही असो, सोशल साईटस् आणि सोशल मीडिया क्रिया-प्रतिक्रियांनी गच्च भरलाच पाहिजे असा जणू दंडकच झाला आहे. पुन्हा त्यात जबाबदारीपेक्षा हक्काचा भाग
जास्त असल्याने सगळाच कारभार बेभान आणि बेफाट असतो. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि मराठी माणूस त्याचा अनुभव घेतच आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची सुनियोजित पद्धतीने बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जात आहे. पुन्हा या गॉसिपिंगचा कोणी त्यांच्या पद्धतीने समाचार घेतलाच तर तुमची ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळी मांजरे लगेच आडवी जातात. तथाकथित मुस्कटदाबीच्या बोंबा मारल्या जातात. न्या. रामण्णा यांच्या बोलण्याचा रोख समाजमाध्यमांवरील बेताल टीका-टिप्पणीकडे आहे. कायदेशीर बंधनांमुळे त्याचा प्रतिवाद करण्यास न्यायव्यवस्थेचे ‘हात बांधलेले’ आहेत. या बंधनावरही त्यांनी बोट ठेवले आहे. ‘सोशल साइटस् आणि मीडियाच्या वृत्तांमध्ये न्यायाधीशांना खोटय़ा आरोपांना तोंड द्यावे लागते. आम्ही मोठय़ा पदांवर असल्याने ‘त्यागमूर्ती’ बनून
खोटी जननिंदा सहन करावी लागते. त्यात कायद्याचे बंधन असल्याने स्वतःची बाजूही मांडता येत नाही’, अशी खंत न्या. रामण्णांसारखे वरिष्ठ न्यायाधीश व्यक्त करतात तेव्हा त्यामागील शल्य सगळय़ांनीच समजून घ्यायला हवे. न्या. रामण्णा यांच्या सुरात सरन्यायाधीश शरद बोबडे यांनीही त्यांचा सूर मिसळला आणि या त्यागाची जाण ठेवून न्यायव्यवस्थेचा सन्मान सर्वांनीच ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सरन्यायाधीशांची अपेक्षा रास्तच आहे. असेही शिवसेनेनं म्हटले आहे.