गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्थेसाठी शिवसेनेच्या उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेत स्वत:च्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी समिती स्थापन केली आहे.या समितीत शिवसेनेकडून गुपीनाथ मुंडे यांच्या कन्या व माजी आमदार पंकजा मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे
.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्थेला युती सरकारच्या काळात निधीअभावी घरघर लागली होती . विशेष म्हणजे ही संस्था स्थापन झाल्यानंतर मुंडे यांच्या कन्या माजी पंकजा मुंडे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणालाही या संस्थेच्या विकासासंबंधी युती सरकारच्या काळात फारशी विचारणा झाली नाही. मात्र, आता सामंत यांनी स्थापन केलेल्या समितीत पंकजा यांचा समावेश केला आहे. यानिमित्ताने शिवसेना पंकजा मुंडे यांच्याशी जवळीक साधत असल्याचेही समोर येत आहे. या राज्य शासनातील मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांना समितीत स्थान देण्यात आले नाही. यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, असा सामना रंगण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
सामंत यांनी शुक्रवारी मुंबईत घेतलेल्या बैठकीत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी एकूण २७ विषय मांडले. गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्थेला पुरेसा निधी उपलब्ध नसून, राज्य शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीवर उच्च शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेत स्वत:च्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, पंकजा मुंडे, उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने, मंत्रालयातील उपसचिव साबळे आदींचा समावेश असणार आहे. ही समिती संस्थेच्या नियोजनबद्ध विकासासाठी अहवाल तयार करणार आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.